शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार

शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार

जागर जनस्थान ऑनलाईन

एकनाथ शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगळे कार्यालय उभारण्यात येईल.

आमदार सदा सरवणकर म्हणाले की, हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. याबरोबरच मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये असंच एक कार्यालय उभारण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरवणकर यांनी दिलीय.

या कार्यालयांसाठी जागा निश्चित झाल्या असून त्या-त्या प्रभागातील शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या सोडवतील. शिवसेनेचे नेते देखील या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या समजून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिली आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आता शिंदे गटाने दादारमध्ये वेगळं कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेलं शिवसेना भवन देखील दादरमध्येच असून आता शिंदे गटाने देखील  त्यांचे मुख्य कार्यालय दादरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.